Wednesday, December 14, 2011

परतफेड

सलग तिसर्‍या मिटींग मधून राज बाहेर पडला तेंव्हा घड्याळात दुपारचा १ वाजून गेला होता. म्हणजे तशी ही त्याच्या जेवणाचीच वेळ होती. कॉन्फरन्स रूम मधून तडक स्वतःच्या केबिन मध्ये येताच त्याच्या लक्षात आलं की आज त्याने घरून जेवणाचा डब्बा आणला नाहिये।

सकाळी लवकर ऑफीसला पोचण्याच्या नादात आज डबा आणला नव्हता. त्यामुळे राजला आता ऑफीसच्या बाजूला असलेल्या टपरीवर जाणे क्रमप्राप्त होते. पोटातले कावळे त्यांच्या वेळेनुसार आता कोकलायला लागले होते, म्हणून मग जास्त वेळ विचार करण्यात न घालवता राज तडक टपरीवर निघाला.

तेलात अखंड न्हाऊन निघणारी फ्लॉवर बटाटा भाजी आणि चामट पोळ्या घशाखाली कशाबशा उतरवत राज टपरी मधून बाहेर पडला आणि ऑफीसकडे यायला निघाला. दोन पावलं पुढे आल्यावर रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका म्हातार्‍या बाईंकडे त्याचं लक्ष गेलं. ती बाई तिच्या पुढे असलेल्या टोपलीतील पेरू विकत होती. लांबून तरी ते पेरू चांगले दिसत होते. ते पेरू बघताच नकळतच राजची पावले त्या टोपलीकडे वळली. थोडे पिवळे झालेले ते पेरू त्याला खुणावत होते. एखाददुसरा पेरू घावा या उद्देशाने राज ने पुढे होऊन त्या बाईला पेरूचा भाव विचारला.

"चार रुप्याला एक आनि धा रुप्याला तीन"त्या म्हातार्‍या बाईने साधा सरळ हिशोब सांगितला. दहा तर दहा, असा विचार करून राज ने तीला ३ पेरू द्यायला सांगितले।"
आज्जे, ३ पेरूंच्ये धा न्हाई तर बारा रुप्ये होत्यात"
हे कोण बोलिले बोला असा विचार करेपर्यंत राजचं लक्ष त्या बाईच्या बाजूला बसलेल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलाकडे गेलं. पांढरा शर्ट आणि जुनाट खाकी पँट या वेषात असलेल्या या मुलानेच हा हिशोब बिनचूक सांगितला होता. पोरगा चुणचुणित दिसत होता. त्या बाईशेजारी बसून कसलतरी पुस्तक वाचत होता आणि पुस्तक वाचता वाचताच त्याने त्या बाईची so called चूक सुधारली होती.
राजला त्या मुलाचं कौतूक वाटलं आणि त्या मुलाला त्याच नाव विचारलं।"
मारुती सदा डेरे"
"शाळेत जातोस का?"
"व्हय"
"कुठल्या शाळेत?"
"ह्या मागच्या गल्लीतल्या जेडपीच्या सालेत"
"कितवीत आहेस"
"आटवीत"
या दोघांचे संभाषण मध्येच तोडीत ती बाई म्हणाली
"काय बी उप्येग न्हाई बगा ह्येचा साळंत जाऊन. हितं माज्याबरूबर प्येरु इकायला बसला तरी मोप झालं. मला मेलीला तेचीच मदद व्हील"
"असं कसं म्हणता बाई? शाळेत जायलाच पाहिजे. शिकायलाच पाहिजे"
"अवो सायेब, साळं जाउन शिकन्यासाटी बुकं लागतात की कुटून आनायची? त्येला लागणारा पैका कुटुन आनायचा?"

या उत्तरावर राज बर्‍यापैकी निरुत्तर झाला, कारण त्याने याचा कदाचित कधी विचारच केला नव्हता. अर्थात पुढच्या कामाचा डोंगर डोळ्यापुढे दिसू लागताच, राजने आपले संभाषण आवरते घेतले आणि निमूटपणे १२ रुपये देऊन ३ पेरू घेतले आणि ऑफीसमध्ये चालू लागला.

राज ऑफीसमध्ये गेला खरा पण उरलेला दिवस त्या बाईचे प्रश्न त्याच्या मनातून काही जात नव्हते. थोडीशी अस्वस्थता घेऊनच राज संध्याकाळी घरी गेला. मनातल्या कुठल्यातरी कोपर्‍यात दडलेली ही अस्वस्थता त्याला बेचैन करत होती.

अख्खी रात्र या बेचैनीत घालवल्यानंतर मनाशी काहीतरी ठरवून राज ऑफीसला निघाला. ऑफीसमध्ये जाण्यासाठी बिल्डिंग मध्ये शिरला खरा, पण कालची ती बेचैनी त्याला काही ऑफीसच्या कामात लक्ष लागू देईना. शेवटी मरो ते काम, असं म्हणून राज पुन्हा खाली उतरला तो त्या कालच्या पेरू विकणार्‍या बाईला आणि तिच्या मुलाला शोधायला.

सुदैवाने त्याच जागेवर त्याला ती म्हातारी बाई आणि तिचा मुलगा दिसला. राज त्यांच्यापाशी पोचला तेंव्हा ती बाई दुसर्‍या कोणालातरी पेरू विकत होती. ते गिर्‍हाईक पेरू विकत घेऊन गेल्यावर बाईने राजला पेरू दाखवायला सुरुवात केली.

"मला पेरू नकोयत. तुमच्याशी काहीतरी बोलायचय"
"माज्याशी काय बोलाचं वो साह्येब तुमास्नी?"
"काल तुम्ही म्हणालात की तुम्हाला तुमच्या मुलाच्या शाळेसाठी पुस्तकं घ्यायला परवडत नाही म्हणून तुम्ही त्याला शाळेत जाऊ नको असं म्हणता. तुमच्या मुलाने शाळेत शिकून मोठं व्हावं असं वाटत नाही का तुम्हाला?"
"आवो साह्येब, मला मोप वाटतं की माज्या मुलानं खुप शिकावं आणि मोठ्ठ साह्येब बनावं पण त्यासाठी लागनारा पैका न्हाई माज्याकडं. त्यो कुटुन आनायचा?"
"तुमची खरच जर का मुलाला शिकवायची इच्छा असेल, तर मी काही मदत करू शकेन. मी त्याला शाळेची पुस्तकं घेऊन देईन, पण त्याने शाळा सोडू नये, असं मला वाटतं"
"पन साह्येब, तुमी काहून आमास्नी मदद करनार?"
"ही तुम्हाला मदत नाहीये, तर काही वर्षांपुर्वी अशाच एका मुलाला मिळालेल्या मदतीची परतफेड आहे".

त्या बाईला काहीच समजेना. तिचा तो blank चेहरा बघून राज ने तिला समजावलं,
"हे बघा बाई, साधारण १५ वर्षांपुर्वी मी असाच लहान असताना, मला एका धनिकाने अशी मदत केली होती. त्या मदतीमुळेच मी माझं शिक्षण पुर्ण करू शकलो. माझं शिक्षण पुर्ण झाल्यावर चांगली नोकरी मिळाली. पण मला मिळालेल्या त्या मदतीची परतफेड त्या धनिकाला कशी करायची ते कळत नव्हतं.
शेवटी एक दिवस मनाचा हिय्या करून मी त्या धनिकाकडे गेलो आणि त्यांनाच विचारलं की तुम्ही मला शिक्षणासाठी जे पैसे / पुस्तकं दिली होतीत, त्याची परतफेड कशी करू? त्यावर त्यांनी मला सल्ला दिला की, याची परतफेड करायचीच असेल तर तुझ्यासारखा एखादा गरजू मुलगा शोध आणि त्याला शिक्षणासाठी मदत कर. आज तुमच्या मुलाच्या रुपात मला या परतफेडीची संधी मिळते आहे. कृपया त्याला नाही म्हणू नका."

त्या बाईच्या डोळ्यात अश्रु तरळले होते. राज ने सांगितलेला प्रत्येक शब्द कदाचित त्या बाईला कळला नसावा पण त्याच्या भावना मात्र तिच्यापर्यंत पोचल्या होत्या. त्या भावनांची पोचपावती त्या अश्रुंद्वारे प्रकट होत होती, तर राजच्या चेहर्‍यावर परतफेडीचा आनंद झळकत होता.

2 comments:

Harshal Raje said...

Sundar.... nice short story.... i liked it. keep writing.

suwarna said...

Arun u r g888 !! its 222 gud !