Tuesday, September 2, 2008

माझ्याच बाबतीत का?

हे सगळं असच फक्त
माझ्याच बाबतीत का घडतं?

चुक कोणाचीही असली तरी
बॉसच्या नजरेत मीच येतो
अगदी रजेवर नसून सुद्धा
कामचुकारीचा शिक्का बसतो

घाईघाईत घरून निघताना
नेमकी बायकोला आठवण येते
सावकाशीने करायच्या कामांची
यादी तत्परतेने सादर होते

बस मध्ये चढल्या चढल्या
बसायला चक्क जागा मिळते
शेजारची सीट रिकामी असूनही
"ती" मात्र दुसरीकडेच बसते

ग्रहतार्‍यांवर विश्वास नसून सुद्धा
भविष्य वाचणे काही चुकत नाही
असल्या नशिबाचा विचार करणे
मान्य नसूनही टळत नाही

Thursday, June 26, 2008

पाऊस

पाऊस आला पाऊस आला
चहु बाजूंनी पुकारा झाला

कधी डोंगरावर तर कधी नदीकाठी
जाणवून देतो अस्तित्व तो
मनाचिया कोंदणी प्रियाच्या
रिमझिम जागवून देतो तो

आठवणींच्या कडेकपारी
पाऊस दाटून राहतो नेहमी
उनाड वारा अन् धुंद हवा
जागवतात नकळत रम्य आठवणी

तसा हा पाऊस नेहमीचाच
पण प्रत्येक वेळी हवाहवासा
असून अडचण नसून खोळंबा
ही म्हण सार्थ करणारा

Tuesday, January 15, 2008

मैत्री

१९८६ च्या जून मध्ये दहावी पास झाल्यानंतर शाळेतील आम्ही सगळे मित्र दहा दिशांना पांगलो. बरोबर २१ वर्षांनंतर गेल्या महिन्यात पुन्हा एकदा भेटलो. त्यानिमित्ताने केलेली ही कविता ...
===============

नविन मित्र नविन जग सगळच नविन होतं तेंव्हा
शाळेच्या उंबरठ्यावरून पाऊल पडलं बाहेर जेंव्हा

नव्या आकांक्षा नवी जिद्द आणि क्षितिजापार दृष्टी
लोभसवाणी तरीही अनोळखी होती ती सृष्टी

तेरा वर्षांच्या शाळेच्या सहवासानंतरची
एका नविन आयुष्याची साहसी सुरुवात होती ती

जुने मित्र मागे राहिले फक्त उरल्या आठवणी
त्याच आठवणींची झाली बहुपयोगी शिदोरी

धडपडलो, ठेचाळलो प्रसंगी यशस्वी सुद्धा झालो
शाळेतील सवंगड्यांची सय विसरू नाही शकलो

आज एकवीस वर्षांनंतर तीच उर्मी पुन्हा दाटून आली
वर्गातील बालमित्रांची नाव धडाधड आठवू लागली

वाटलं यातलं कुणीतरी भेटावं कुणाशीतरी बोलावं
आपलच बालपण पुन्हा एकदा मनसोक्त उपभोगावं

मनातल्या प्रतिमांची उजळणी मनातच होत राहिली
अन अचानक एक दिवस सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली

वयोमानपरत्वे पोटं सुटली, जाडी वाढली
बर्‍याच डोक्यांवरची काळी छप्परं पण उडाली

सारं काही बदललय असं एका क्षणी वाटलं
पण बाहेरच्या ध्यानापेक्षा अंतर्मनच ग्वाही देऊन गेलं

कितीही वर्षं जाऊ देत अथवा लांब असू कितीही
मनामनांच्या या नात्यांची वीण घट्ट धाग्यांची

या विश्वासाची आहे सगळ्यांनाच खात्री
त्यावरच उभारली आहे आम्हा सगळ्यांची मैत्री

Friday, January 11, 2008

रुटीन

नविन वर्ष, नविन महिना, नविन दिवस
म्हणायच आपलं नविन म्हणून
पण आहे सगळे नेहमीचेच
रुटीन कामाचे रात्र अन् दिवस

रोज सकाळी हापिसात पोचायची नेहमीचीच घाई
हापिसात गेल्यावर नेहमीचीच कामाची यादी
आजचं काम उद्यावर ढकलू म्हटलं तर
उद्याच्या कामांची दुसरीच यादी

मीटींग्ज कॉन्फ़रन्सेस अन मुलाखती
यांची न संपणारी नाजूक नाती
दुसर्‍यांचा मूड सांभाळत सांभाळत
आपणच करायच्या या सगळ्या कवायती

बॉसच्या अपेक्षा आणि ज्युनिअर्स च्या आकांक्षा
फायनांस च्या धमक्या आणि एच आर च्या नियमावल्या
या सगळ्या गलबल्यामध्ये हरवल्या आहेत
स्वत:ने ठरवलेल्या स्वत:च्या इच्छा

अशा या रहाटगाडग्यातून
बाहेर पडावेसे वाटत आहे
त्याचाच प्लॅन ठरवण्यासाठी
एक मीटींग शेड्युल केली आहे

मात्र या मीटींग मध्ये
इतर कुणाचाही सहभाग नसेल
मी आणि माझ्या इच्छा
यांचाच फक्त अंतर्भाव असेल