Monday, September 17, 2007

गणनायका

गणनायका विनायका
कार्यारंभी नमितो तुजला
विघ्नविनाशक नाम तुझे हे
खात्री देई सर्वांना

अनंत लीला अन् कथा तुझ्या या
साक्ष देती तुझ्या कल्पकतेला
विश्वप्रदक्षिणा घालण्याकरिता
तुला पाहिजेत फक्त मातापिता

सर्व कलांचा राजा तू
सुखकर्ता अन् दु:खहर्ता ही तू
संकटसमयी अडचणीतुनी
भक्तांना तारिसी तू

मुषकरुपी वाहनावरी
तुंदिलतनू आकारातही
दुर्वांकुर धारण करूनी
देसी दर्शन सकळांना

अशा लाडक्या गणरायाचे
स्वागत करूनी प्रसन्नवदने
दहा दिसांचा उत्सव करूनी
भक्तजन हे सुखावले

Monday, September 3, 2007

पु. ल. ---- एक आठवण

आपल्या लाडक्या पु. लं. च्या जन्मदिनी लिहिलेली ही कविता .....

शिकविलेत तुम्ही आम्हा जीवनाचे सार
तुमच्याच निखळ विनोदाने
आज स्मृतीदिनी तुमच्या
हाती केवळ तुमचे लिखाण

व्यक्तीचित्र असो वा असो प्रवासवर्णन
नाटक असो वा भाषांतरे चार

रावसाहेब, अन्तू बर्वा अथवा धोंडोपंत
या व्यक्तीरेखांत मज दिसे मी पण

लंडन जपान असो वा अमेरिका
जणू आम्हीच केले दौरे तुमच्यासह

प्रवासवर्णनापरी प्रवासातील मी
हाच होता सारा लेखनप्रपंच

काकाजी असो वा असो ती फुलराणी
माय मराठी जणू भासे तुमच्या चरणांची दासी

आता केवळ तुमचे शब्द जपून ठेवणे
पु. ल. असते तर .... याच विषयावर बोलणे