Sunday, April 5, 2009

पार्टी

एप्रिल - मे चे दिवस. उन नेहमीप्रमाणे दिवसभर आग ओकत होते. अशाच एका शनिवारी संध्याकाळी गंप्या घरासमोरच्या अंगणात येरझार्‍या घालत होता. चार महिन्यांपुर्वी लग्न झाल्यापासून गंप्याला आपल्या मित्रांबरोबर टाईमपास करायला वेळच असा मिळाला नव्हता. पण आज चान्स होता. बायको दुपारीच माहेरी गेली होती आणि डायरेक्ट उद्या परतणार होती, त्यामुळे आजच्या रात्री मित्रांबरोबर जंगी पार्टी करण्याचा चांगला चान्स होता. पण अंगणात तिर्थरूप आणि किचन मध्ये मातोश्री यांना काय सांगून बाहेर पडायचे याचाच विचार मनात होता.
दुसरं म्हणजे गावात गंप्याचे दोनच मित्र होते, अव्या आणि किश्या. दोघेही अजून बिनलग्नाचेच होते, त्यामुळे त्यांना पार्टीसाठी काही प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे नसावा, असे गंप्याला वाटले. पण एकदा विचारले पाहिजे म्हणून गंप्याने पहिल्यांदा अव्याला फोन लावला.

अव्या नेहमीप्रमाणे तयारच होता पार्टीसाठी. त्यातच त्याने बातमी दिली, की करोना का कोरोना म्हणून काहीतरी नविन बीयर आली आहे मार्केटमध्ये. मग काय, आजच्या पार्टीत हीच बीयर ट्राय करायचा असा बेत ठरला या दोघांचा. आता प्रश्न होता तो जागेचा. अव्या आणि गंप्याच्या दोघांच्याही घरी शक्य नव्हते कारण दोघांचेही आईवडील घरातच होते. पण किश्याकडे तसा काही प्रॉब्लेम नव्हता, कारण तो एकटाच (P.G.) म्हणून राहत होता. म्हणून मग सगळा स्टॉक घेऊन त्याच्याकडेच जायचं ठरलं.

हे सगळं ठरवलं पण किश्याला जमणार आहे की नाही याचा विचारच आपण केला नाहिये, हे अव्याच्या लक्षात आलं आणि त्याने चटकन किश्याला फोन लावला.
"काय रे मित्रा, आज संध्याकाळचा काय प्लॅन?" अव्या
"अरे जरा कामिनी बरोबर बाहेर जाणार आहे, पण ८ - ८:३० पर्यंत मोकळा होईन" किश्या म्हणाला.
हे ऐकल्याबद्दल चटकन अव्याच्या लक्षात आलं की गेले काही दिवस किश्या या कामिनी नावाच्या नाजूक प्रकरणात थोडासा गुंतला आहे. पण निदान ८:३० नंतर मोकळा होणार आहे, हे ऐकून अव्या निर्धास्त झाला.
"तुझ्या फ्लॅटची ची चावी शेजारी ठेऊन जा रे" अव्याने किश्याला सगळा प्लॅन समजाऊन सांगितला आणि अव्या पुढच्या तयारीला लागला.

बरोब्बर ८ च्या सुमारास गंप्या तयार होऊन बाहेर पडतच होता की इतक्या अव्या बाईकवरून आलाच गंप्याला न्यायला.
"बरं झालं आलास ते. मी विचारच करत होतो, की कसं जायचं किश्याकडे याचा" गंप्या
"मग, यायलाच पाहिजे, आज तुला चक्क आमच्यासाठी वेळ मिळाला आहे ना? वहिनींनी परवानगी कशी दिली?" अव्या ने विचारलं.
"अरे परवानगी द्यायला इथे विचारतय कोण? आज सुलू माहेरी गेलीये म्हणून तर हा स्वातंत्रदिन.
चल निघुया पटकन, नाहीतर आमच्या तिर्थरूपांचे प्रवचन सुरू होइल इथे" गंप्या घाईघाईने म्हणाला.
"हो रे बाबा. ते टीव्हीवरचे बापू परवडले, पण तुमचे तिर्थरूप म्हणजे........ असो" अव्या ने लगेच बाईकला किक मारून बाईक सुरू केली.

वाटेतच पार्टीसाठी लागणारी बीयर आणि योग्य तो चकणा घेऊन ते दोघे किश्याच्या घरी पोचले.
एव्हाना किश्यापण घरी यायला पाहिजे होता. तो अजून आला नव्हता पण शहाण्या मुलासारखं त्याने फ्लॅटची किल्ली शेजारच्या काकूंकडे दिली होती, त्यामुळे अव्या आणि गंप्याचा बाहेर पुतळा झाला नाही.
फ्लॅटमध्ये येताच अव्याने बीयर फ्रीजमध्ये ठेवली, आणि दिवाणखान्यात आला. इथे गंप्याने ऑलरेडी टीव्ही चालू केला होता, आणि कतरिना काकूंचा डान्स बघण्यात गुंग झाला होता.
"आमच्याकडे सध्या हे असले चॅनल्स लागत नाहीत रे" गंप्याने आपले दु:ख अव्यासमोर मांडले.
"अरे रिमोटचा ताबा आपल्याकडे असला ना, म्हणजे सगळे चॅनल्स लागतात बरं" अव्या गंप्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
"तुझं लग्न झालं नाहिये ना म्हणून तू असं म्हणतोयस. लग्न झाल्यावर मग कळेल, की रिमोट कोणाच्या हातात असतो ते." गंप्या थोडा वैतागूनच बोलला.
"अरे पण हा किश्या कसा आला नाही अजून?
किती वेळ वाट पाहायची?
एकतर इतक्या महिन्यांचा उपास, आणि त्यात हा किश्या अजून वेळ घालवतोय" गंप्या आता बीयर पिण्यासाठी अधीर होत चालला होता.
"आपण एक काम करू. आपण सुरुवात तर करू. किश्या आला की तो आपल्याला जॉईन होइल. चालेल का?" अव्याने यावर योग्य तो तोडगा काढला.
"अरे नेकी ऑर पुछ पुछ? चल लगेच सुरू करुया" गंप्या हे बोलत बोलत किचन मध्ये गेला आणि बीयरच्या दोन बाटल्या घेउन आला.
"अरे ग्लास पण आणायचेस ना?" अव्या कावला
"ग्लास कशाला? लाव बाटलीच तोंडाला" गंप्याने आज्ञा केली

प्रत्येकी दोन दोन बाटल्या रिचवून गंप्याने जेंव्हा तिसरी बाटली उघडली, तेंव्हा अव्याच्या लक्षात आलं की अजून किश्या आलेला नाहिये.
"अजून कसा आला नाही रे किश्या" अव्याने गंप्याला विचारले, आणि दिवाणखान्यात फेर्‍या मारू लागला.
"तू एका जागी बस बघू, फेर्‍या मारू नकोस. फेर्‍या मारता मारता कुठल्यातरी बाटलीला धकका लावशील आणी बीयर फुकट घालवशील" गंप्याने अव्याच्या फेर्‍यामारण्याच्या चालीवरून त्याला फटकारले.
"अरे तो बघ, किश्याच येतोय." अव्या एव्हाना खिडकीपाशी पोचला होता, आणि खिडकीतूनच त्याने किश्याला पाहिले होते.
"या किशनमहाराज, कुठल्या राधेला घेऊन प्रणयक्रीडा चालू होती तुमची?" आल्या आल्या किश्यावर गंप्याने प्रश्नाचा भडिमार सुरू केला.
"अरे कुठल्या काय? कामिनीला घेऊन गेलो होतो फिरायला. तिला घरी सोडलं आणि लगेच आलो इथे." किश्याने आज्ञाधारक मुलासारखे उत्तर दिले.
इतक्यात अव्याने आत जाऊन अजून एक बीयरची बाटली आणली आणि किश्याच्या हातात दिली.
"चिअर्स" म्हणत तिघांनीही आपल्या हातातील बाटल्या उंचावल्या आणि प्यायला सुरुवात केली.

इतक्यात दारावरची बेल वाजली.
"आता कोण आलं मरायला?" अव्या आणि किश्या नकळत एकच वाक्य एकाच वेळेस बोलले.
तेव्हड्यात गंप्या उठला आणि त्याने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर एक पन्नाशीचा माणूस एकदम घरात घुसला आणि त्याला पाहून किश्याच्या चेहर्‍यावरचा रंगच उडाला.
"काका तुम्ही?" इतकंच वाक्य किश्या बोलू शकला.
अव्या आणि गंप्याला काहीच सुधरेना, की हा माणूस कोण आहे, आणि किश्या असा का घाबरला आहे.
"काका तुम्ही इथे कसे? तुम्हाला माझा पत्ता कोणी दिला? किश्या अजूनही घाबरलेल्या अवस्थेतच होता.
"अरे हे कामिनी दिशपांडे चे वडील" किश्याने हळूच अव्या आणि गंप्यासमोर उलगडा केला.
अच्छा म्हणजे हा काका, कामिनीचा बाप आहे तर. अव्या आणि गंप्याच्या डोक्यात थोडा थोडा प्रकाश पडू लागला होता. पण आता हा थेरडा इथे काय करणार आहे? गंप्याच्या डोक्यात किडा वळवळलाच.

किश्या अजूनही काकांकडेच बघत होता. काय बोलावं हेच सुचत नव्हतं त्याला. शेवटी न राहवून अव्याच म्हणाला, "काका, आत तर या. इथे आजुबाजुंच्या लोकांसमोर नको" तमाशा हा शब्द वापरायचा मोह महत्प्रयासाने टाळून अव्या बोलला.
काका दिवाणखान्यातल्या सोफ्यावर बसले आणि त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली किश्यावर.
किश्या अजून गांगरलेल्या अवस्थेतच होता.
"नाव काय तुमचं?
काय करता?
गंगाविहार सोसायटी मध्ये काय करत होतात?"
ततपप करून काकांच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. त्याच्या या गांगरण्यामुळे अव्या आणि गंप्या अजूनच वैतागत होते. पार्टीचा सगळा मूड जात होता. उरत होता फक्त प्रश्नोत्तराचा तास.

गंप्याला वाटलं एकदा चांगलं खडसवावं किश्याला आणि म्हणावं
"अरे बालका, केलं आहेस ना प्रेम कामिनीवर? मग आता कशाला तिच्या बापासमोर घाबरतोस? सरळ सांगून टाक त्याला, की हो आहे माझं कामिनीवर प्रेम".
पण किश्यामध्ये इतका दम नाहिये, हे गंप्याला माहित होतं.
पार्टीचा पुरता सत्यानाश होत असलेला पाहून शेवटी गंप्याला राहावलं नाही, आणि तोच पुढे होऊन म्हणाला
"अहो काका, हे वयच असं असतं. जडतं अशा वेळेस प्रेम एकमेकांवर. त्यात एव्हडं लाऊन काय घ्यायचं मनाला?
हा किश्या काही अगदीच काही हा नाहिये. मनापासून प्रेम करतो तो कामिनीवर." गंप्या काय बोलतोय ते चटकन काकांच्या लक्षातच आलं नाही.
"काय म्हणताय तुम्ही? कोण करतय प्रेम कामिनीवर? मी इथे यांच रस्त्यात पडलेलं पाकिट द्यायला आलो होतो.
"काय?" आश्चर्यचकित होऊन किश्या ओरडला
"हो काय काय? मगाशी तुमची आमच्या घराजवळून जाताना धांदरटासारखे कुत्र्याकडे बघत बघत बाईकवरून पडलात तेंव्हा तुमच्या खिशातलं हे पैशाचं पाकिट पडलं ते द्यायला म्हणून मी तुमच्या मागे येत होतो. बर्‍याच हाका मारल्या, पण तुम्ही काही मागे वळून पाहिलं नाहीत, म्हणून मग इथंपर्यत यावं लागलं मला. " काकांनी सगळा इतिहास कथन केला.

पण या सगळ्यात किश्याचं कामिनीवर प्रेम आहे, ही अंदरकी बात काकांना कळलीच आणी ते पुन्हा एकदा संतापले.
गंप्याला आता आपली चुक समजली होती. त्याच्या गाढवपणामुळेच काकांना किश्या आणि कामिनीच्या प्रेमप्रकरणाचा सुगावा लागला होता. त्यामुळे ती चुक निस्तरायलाच पाहिजे होती पण अर्थात चुक निस्तरायला आता तेव्हडा वेळ नव्हता.

शेवटी अव्या पुढे आला, आणि म्हणाला
"थ्यांकू काका, या किश्याचं पाकिट परत आणून दिल्याबद्दल.
आता इथपर्यंत आलाच आहात तर घेणार का थोडी आमच्याबरोबर?"
या ऑफरचा मात्र काकांनी विनाविलंब स्वीकार केला आणि गंप्याने किचन मध्ये जाऊन अजून एक बाटली आणली.
"चिअर्स" या तिघांबरोबर काकांनी सुद्धा हात उंचावला आणि बीयरचा पहिला घोट घेतला.

3 comments:

Sandeep said...

wa wa Arun!!! Mag kadhi karaaychi party? ;-p

Meenakshi Hardikar said...

are vA kaka pharacha samajutadar nighale buva. :) baki kavitechya prantanantara katha prantata tumhi kelela padarpan sukhad ho a. aa.

राफा said...

लगे रहो..
ह्या गोष्टीला 'कामिनीचे करवादलेले काका कुरकुरणार का करोना (का कोरोना) करणार कार्यपूर्ती' हे शीर्षक कसे वाटते ? :)