Friday, December 8, 2017

मी सुद्धा ....

मी सुद्धा .... 



गेल्या आठवड्यात आमच्या रॅले या गावात ५ किलोमीटर धावण्याचा / चालण्याचा एक इव्हेंट होता.  आर्थ्रायटिस पेशंटच्या मदतीसाठी एका सेवाभावी संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. साधारण माझ्या ऑफीसमधल्या १०० पेक्षा जास्त सहकाऱयांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता. माझ्या ऑफीसने आमच्या वतीने या संस्थेला डोनेशन दिले होते. 

यात कार्यक्रम आणि स्पर्धा असा दुहेरी उद्देश होता. दुहेरी अशासाठी की पहिल्या ३ स्पर्धकांसाठी बक्षिसे आणि इतरांना ५ किमी अंतर पूर्ण करण्यासाठी उत्तेजन हे असे दुहेरी उद्देश होते. अशा इव्हेंट मध्ये प्रथमच भाग घेतला होता, त्यामुळे मनात थोडी धाकधूक होती की आपल्याला ५ किमी चे अंतर व्यवस्थित पार करता येईल की नाही. त्यामुळे माझा सहभाग या कार्यक्रमात ५ किमी अंतर पूर्ण करायचे या उद्देशानेच होता. 

कार्यक्रम सकाळी १०:३० वाजता सुरु होणार होता, म्हणून मी आणि माझा मित्र, अभिजीत, साधारण १० च्या सुमारास कार्यक्रमाच्या नियोजित ठिकाणी पोचलो. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्या वयोगटातील व्यक्ती अगदी उत्साहाने यात सहभागी झाल्या होत्या. 

प्रथम लहान मुलांसाठी १ किमी धावण्याची स्पर्धा सुरु झाली. बरीच लहान मुलं जॉगिंग सूट घालून तयारच होती. त्यांची स्पर्धा चालू झाल्यानंतर आम्ही रजिस्ट्रेशन कॉउंटर वर जाऊन आमचे टी शर्ट्स ताब्यात घेतले आणि आम्ही पण ५ किमी धावायला तयार झालो. 

साधारण १०:१५ च्या सुमारास सगळ्या स्पर्धकांना शर्यत सुरू होण्याच्या ठिकाणी बोलावण्यात आलं. आपल्या आपल्या स्पीड प्रमाणे वेगवेगळ्या गटात उभे राहण्यास सांगितले गेले. मी सुद्धा माझ्या स्पीड च्या हिशोबाने योग्य त्या गटात जाऊन उभा राहिलो. 

बरोबर १०:३० वाजता शर्यत सुरु झाली आणि एकेक गटाने धावायला सुरुवात केली. आमच्या गटाचा नंबर येईपर्यंत १:३०. मिनिटे आधीच झाली होती. अर्थात आमच्या गटात सगळे शर्यत जिंकण्यापेक्षा ५ किमी अंतर पूर्ण करण्याच्या तयारीने आले होते, त्यामुळे या १:३० मिनिटाचा फारसा विचार झाला नाही. 

सुरुवातीच्या १-२ किमी मध्ये सगळ्यांचाच धावण्याचा उत्साह प्रचंड होता. मी पण त्याला अपवाद नव्हतोच. पण साधारण २ किमी नंतर एकेक गाडी धावण्याचा वेग कमी करू लागला. जोरात धावणे, धावणे, जोरात चालणे असे वेगवेगळे प्रकार करत आम्ही २.५ किमीचा अर्धा टप्पा पार केला. बर्यापैकी दम लागला होता पण पूर्णपणे दमणूक झाली नव्हती आणि उत्साह तर अजिबातच कमी झाला नव्हता. त्यामुळे अर्धा टप्पा तर पार झालाच आहे, उरलेला पण पार करू हा आत्मविश्वास अधिकच दृढ झाला. उरलेल्या हा टप्पा पण पूर्ण दमणूक न होता पार पडला आणि अशा रीतीने मी प्रथमच ५ किमी च अंतर धावत / चालत पार केलं. 

५ किमी हे काही फार मोठं अंतर नाही. मॅरेथॉन मध्ये भाग घेणारे स्पर्धक यापेक्षा खूप जास्त अंतर धावत पार करतात. पण माझ्यासाठी हे ५ किमी पार करणं हेच एक दिव्य होतं. ते मी नीट पूर्ण करू शकलो याचाच मला जास्त आनंद झाला आणि त्याचबरोबर एक कॉन्फिडन्स मनात निर्माण झाला की मी सुद्धा ...... 
















No comments: