Monday, July 3, 2023

गुरुपौर्णिमेनिमित्त …

 आपण कधी आपल्या शिक्षकांना Thank You म्हटलंच नाही….

आजच्या जीवनात हरघडीला उच्चारले जाणारे शब्द म्हणजे Thank You, Sorry आणि Excuse Me. त्यातील Thank You हा शब्द तर आपण सरसकट कशासाठीही वापरतो. 

पण आत्तापर्यंत आपण आपल्या गुरूजनांना कधीच Thank You म्हणालो नाही. कशामुळे असेल? वास्तविक आपल्याला घडविण्यात, माणूस म्हणून या जगात ताठ मानेने जगायला शिकवणारे हे आपले शिक्षक. किती किती म्हणून नावं घ्यायची? दादांपासून, भानूताई, कुसुमताई, अगदी शिशूवर्गापासून दहावीपर्यंतचे सगळे वर्गशिक्षक आणि इतर विषयांचे शिक्षक. या सगळ्यांनी आपल्याला घडवलं. पण तेंव्हासुध्दा आपण त्यांना कधी Thank You म्हटलं नाही. आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यांनीसुध्दा याची कधीच अपेक्षा ठेवली नाही. 

शाळेत असताना आपण कुठल्याही शिक्षकांकडे कधीही बिनदिक्कत जाऊन त्याची मदत घेत होतो. मग ते गॅदरिंग असो, वक्तृत्व स्पर्धा असो किंवा मग पाठ्यपुस्तकातील कठिण वाटणारा भाग असो. त्यासाठी आपल्याला कधीही त्यांची Appointment घ्यावी लागली नाही. उलटपक्षी जेंव्हा जेंव्हा आपण त्यांच्याकडे गेलो, तेंव्हा तेंव्हा त्यानी आपल्याला तत्परतेने मदतच केली. त्याबद्दल आपण त्यांचे कायमच ऋणी राहू. 

आज आपल्या शिक्षकांपैकी काहीजण आपल्यात नाहीत. पण आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त या सगळ्या शिक्षकांचे मनःपुर्वक स्मरण आणि A Big Thank You. 

केवळ तुमच्यामुळे आम्ही घडलो. तुम्हाला Thank You न म्हणणे हे आम्ही गृहीत धरले होतं. तुम्हाला याची जाणीव होतीच. पण आज मात्र आम्हाला तुम्हा सर्व शिक्षकांना मनापासून Thank You म्हणायचंय. तुमचा आशिर्वाद तुमच्या या बाळांवर असाच अखंड राहू देत. 

🙏🙏🙏🙏🙏

Friday, December 8, 2017

मी सुद्धा ....

मी सुद्धा .... 



गेल्या आठवड्यात आमच्या रॅले या गावात ५ किलोमीटर धावण्याचा / चालण्याचा एक इव्हेंट होता.  आर्थ्रायटिस पेशंटच्या मदतीसाठी एका सेवाभावी संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. साधारण माझ्या ऑफीसमधल्या १०० पेक्षा जास्त सहकाऱयांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता. माझ्या ऑफीसने आमच्या वतीने या संस्थेला डोनेशन दिले होते. 

यात कार्यक्रम आणि स्पर्धा असा दुहेरी उद्देश होता. दुहेरी अशासाठी की पहिल्या ३ स्पर्धकांसाठी बक्षिसे आणि इतरांना ५ किमी अंतर पूर्ण करण्यासाठी उत्तेजन हे असे दुहेरी उद्देश होते. अशा इव्हेंट मध्ये प्रथमच भाग घेतला होता, त्यामुळे मनात थोडी धाकधूक होती की आपल्याला ५ किमी चे अंतर व्यवस्थित पार करता येईल की नाही. त्यामुळे माझा सहभाग या कार्यक्रमात ५ किमी अंतर पूर्ण करायचे या उद्देशानेच होता. 

कार्यक्रम सकाळी १०:३० वाजता सुरु होणार होता, म्हणून मी आणि माझा मित्र, अभिजीत, साधारण १० च्या सुमारास कार्यक्रमाच्या नियोजित ठिकाणी पोचलो. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्या वयोगटातील व्यक्ती अगदी उत्साहाने यात सहभागी झाल्या होत्या. 

प्रथम लहान मुलांसाठी १ किमी धावण्याची स्पर्धा सुरु झाली. बरीच लहान मुलं जॉगिंग सूट घालून तयारच होती. त्यांची स्पर्धा चालू झाल्यानंतर आम्ही रजिस्ट्रेशन कॉउंटर वर जाऊन आमचे टी शर्ट्स ताब्यात घेतले आणि आम्ही पण ५ किमी धावायला तयार झालो. 

साधारण १०:१५ च्या सुमारास सगळ्या स्पर्धकांना शर्यत सुरू होण्याच्या ठिकाणी बोलावण्यात आलं. आपल्या आपल्या स्पीड प्रमाणे वेगवेगळ्या गटात उभे राहण्यास सांगितले गेले. मी सुद्धा माझ्या स्पीड च्या हिशोबाने योग्य त्या गटात जाऊन उभा राहिलो. 

बरोबर १०:३० वाजता शर्यत सुरु झाली आणि एकेक गटाने धावायला सुरुवात केली. आमच्या गटाचा नंबर येईपर्यंत १:३०. मिनिटे आधीच झाली होती. अर्थात आमच्या गटात सगळे शर्यत जिंकण्यापेक्षा ५ किमी अंतर पूर्ण करण्याच्या तयारीने आले होते, त्यामुळे या १:३० मिनिटाचा फारसा विचार झाला नाही. 

सुरुवातीच्या १-२ किमी मध्ये सगळ्यांचाच धावण्याचा उत्साह प्रचंड होता. मी पण त्याला अपवाद नव्हतोच. पण साधारण २ किमी नंतर एकेक गाडी धावण्याचा वेग कमी करू लागला. जोरात धावणे, धावणे, जोरात चालणे असे वेगवेगळे प्रकार करत आम्ही २.५ किमीचा अर्धा टप्पा पार केला. बर्यापैकी दम लागला होता पण पूर्णपणे दमणूक झाली नव्हती आणि उत्साह तर अजिबातच कमी झाला नव्हता. त्यामुळे अर्धा टप्पा तर पार झालाच आहे, उरलेला पण पार करू हा आत्मविश्वास अधिकच दृढ झाला. उरलेल्या हा टप्पा पण पूर्ण दमणूक न होता पार पडला आणि अशा रीतीने मी प्रथमच ५ किमी च अंतर धावत / चालत पार केलं. 

५ किमी हे काही फार मोठं अंतर नाही. मॅरेथॉन मध्ये भाग घेणारे स्पर्धक यापेक्षा खूप जास्त अंतर धावत पार करतात. पण माझ्यासाठी हे ५ किमी पार करणं हेच एक दिव्य होतं. ते मी नीट पूर्ण करू शकलो याचाच मला जास्त आनंद झाला आणि त्याचबरोबर एक कॉन्फिडन्स मनात निर्माण झाला की मी सुद्धा ...... 
















Saturday, May 23, 2015

श्रद्धांजली

माझा वर्गमित्र, राहुल भावे याला १७ मे २०१५ रोजी देवाज्ञा झाली, त्याला ही श्रद्धांजली

तो गेला.
आज ना उद्या तो जाणार हे माहीत होतं.
तरीपण त्याचं जाणं मनाला चटका लावून गेलं.
असं सोडून जाण्याचं हे वय नव्हे,
तरीपण तो गेला.
कदाचित सर्वांच्या विनंतीला मान देऊन,
त्याने त्याच्या व्यसनाला असा निरोप दिला.
आम्हाला तो त्याच्या व्यसनाशिवाय हवा होता,
पण त्याला ते मंजूर नव्हतं.
आज आठवड्यानंतर सुद्धा त्याचं नाव आणि 'गेला' हे एका वाक्यात बसवत नाही.
कारण त्याची आठवण काढल्याखेरीज 'अ' वर्ग कधीच संपुर्ण होत नाही


Wednesday, December 14, 2011

परतफेड

सलग तिसर्‍या मिटींग मधून राज बाहेर पडला तेंव्हा घड्याळात दुपारचा १ वाजून गेला होता. म्हणजे तशी ही त्याच्या जेवणाचीच वेळ होती. कॉन्फरन्स रूम मधून तडक स्वतःच्या केबिन मध्ये येताच त्याच्या लक्षात आलं की आज त्याने घरून जेवणाचा डब्बा आणला नाहिये।

सकाळी लवकर ऑफीसला पोचण्याच्या नादात आज डबा आणला नव्हता. त्यामुळे राजला आता ऑफीसच्या बाजूला असलेल्या टपरीवर जाणे क्रमप्राप्त होते. पोटातले कावळे त्यांच्या वेळेनुसार आता कोकलायला लागले होते, म्हणून मग जास्त वेळ विचार करण्यात न घालवता राज तडक टपरीवर निघाला.

तेलात अखंड न्हाऊन निघणारी फ्लॉवर बटाटा भाजी आणि चामट पोळ्या घशाखाली कशाबशा उतरवत राज टपरी मधून बाहेर पडला आणि ऑफीसकडे यायला निघाला. दोन पावलं पुढे आल्यावर रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका म्हातार्‍या बाईंकडे त्याचं लक्ष गेलं. ती बाई तिच्या पुढे असलेल्या टोपलीतील पेरू विकत होती. लांबून तरी ते पेरू चांगले दिसत होते. ते पेरू बघताच नकळतच राजची पावले त्या टोपलीकडे वळली. थोडे पिवळे झालेले ते पेरू त्याला खुणावत होते. एखाददुसरा पेरू घावा या उद्देशाने राज ने पुढे होऊन त्या बाईला पेरूचा भाव विचारला.

"चार रुप्याला एक आनि धा रुप्याला तीन"त्या म्हातार्‍या बाईने साधा सरळ हिशोब सांगितला. दहा तर दहा, असा विचार करून राज ने तीला ३ पेरू द्यायला सांगितले।"
आज्जे, ३ पेरूंच्ये धा न्हाई तर बारा रुप्ये होत्यात"
हे कोण बोलिले बोला असा विचार करेपर्यंत राजचं लक्ष त्या बाईच्या बाजूला बसलेल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलाकडे गेलं. पांढरा शर्ट आणि जुनाट खाकी पँट या वेषात असलेल्या या मुलानेच हा हिशोब बिनचूक सांगितला होता. पोरगा चुणचुणित दिसत होता. त्या बाईशेजारी बसून कसलतरी पुस्तक वाचत होता आणि पुस्तक वाचता वाचताच त्याने त्या बाईची so called चूक सुधारली होती.
राजला त्या मुलाचं कौतूक वाटलं आणि त्या मुलाला त्याच नाव विचारलं।"
मारुती सदा डेरे"
"शाळेत जातोस का?"
"व्हय"
"कुठल्या शाळेत?"
"ह्या मागच्या गल्लीतल्या जेडपीच्या सालेत"
"कितवीत आहेस"
"आटवीत"
या दोघांचे संभाषण मध्येच तोडीत ती बाई म्हणाली
"काय बी उप्येग न्हाई बगा ह्येचा साळंत जाऊन. हितं माज्याबरूबर प्येरु इकायला बसला तरी मोप झालं. मला मेलीला तेचीच मदद व्हील"
"असं कसं म्हणता बाई? शाळेत जायलाच पाहिजे. शिकायलाच पाहिजे"
"अवो सायेब, साळं जाउन शिकन्यासाटी बुकं लागतात की कुटून आनायची? त्येला लागणारा पैका कुटुन आनायचा?"

या उत्तरावर राज बर्‍यापैकी निरुत्तर झाला, कारण त्याने याचा कदाचित कधी विचारच केला नव्हता. अर्थात पुढच्या कामाचा डोंगर डोळ्यापुढे दिसू लागताच, राजने आपले संभाषण आवरते घेतले आणि निमूटपणे १२ रुपये देऊन ३ पेरू घेतले आणि ऑफीसमध्ये चालू लागला.

राज ऑफीसमध्ये गेला खरा पण उरलेला दिवस त्या बाईचे प्रश्न त्याच्या मनातून काही जात नव्हते. थोडीशी अस्वस्थता घेऊनच राज संध्याकाळी घरी गेला. मनातल्या कुठल्यातरी कोपर्‍यात दडलेली ही अस्वस्थता त्याला बेचैन करत होती.

अख्खी रात्र या बेचैनीत घालवल्यानंतर मनाशी काहीतरी ठरवून राज ऑफीसला निघाला. ऑफीसमध्ये जाण्यासाठी बिल्डिंग मध्ये शिरला खरा, पण कालची ती बेचैनी त्याला काही ऑफीसच्या कामात लक्ष लागू देईना. शेवटी मरो ते काम, असं म्हणून राज पुन्हा खाली उतरला तो त्या कालच्या पेरू विकणार्‍या बाईला आणि तिच्या मुलाला शोधायला.

सुदैवाने त्याच जागेवर त्याला ती म्हातारी बाई आणि तिचा मुलगा दिसला. राज त्यांच्यापाशी पोचला तेंव्हा ती बाई दुसर्‍या कोणालातरी पेरू विकत होती. ते गिर्‍हाईक पेरू विकत घेऊन गेल्यावर बाईने राजला पेरू दाखवायला सुरुवात केली.

"मला पेरू नकोयत. तुमच्याशी काहीतरी बोलायचय"
"माज्याशी काय बोलाचं वो साह्येब तुमास्नी?"
"काल तुम्ही म्हणालात की तुम्हाला तुमच्या मुलाच्या शाळेसाठी पुस्तकं घ्यायला परवडत नाही म्हणून तुम्ही त्याला शाळेत जाऊ नको असं म्हणता. तुमच्या मुलाने शाळेत शिकून मोठं व्हावं असं वाटत नाही का तुम्हाला?"
"आवो साह्येब, मला मोप वाटतं की माज्या मुलानं खुप शिकावं आणि मोठ्ठ साह्येब बनावं पण त्यासाठी लागनारा पैका न्हाई माज्याकडं. त्यो कुटुन आनायचा?"
"तुमची खरच जर का मुलाला शिकवायची इच्छा असेल, तर मी काही मदत करू शकेन. मी त्याला शाळेची पुस्तकं घेऊन देईन, पण त्याने शाळा सोडू नये, असं मला वाटतं"
"पन साह्येब, तुमी काहून आमास्नी मदद करनार?"
"ही तुम्हाला मदत नाहीये, तर काही वर्षांपुर्वी अशाच एका मुलाला मिळालेल्या मदतीची परतफेड आहे".

त्या बाईला काहीच समजेना. तिचा तो blank चेहरा बघून राज ने तिला समजावलं,
"हे बघा बाई, साधारण १५ वर्षांपुर्वी मी असाच लहान असताना, मला एका धनिकाने अशी मदत केली होती. त्या मदतीमुळेच मी माझं शिक्षण पुर्ण करू शकलो. माझं शिक्षण पुर्ण झाल्यावर चांगली नोकरी मिळाली. पण मला मिळालेल्या त्या मदतीची परतफेड त्या धनिकाला कशी करायची ते कळत नव्हतं.
शेवटी एक दिवस मनाचा हिय्या करून मी त्या धनिकाकडे गेलो आणि त्यांनाच विचारलं की तुम्ही मला शिक्षणासाठी जे पैसे / पुस्तकं दिली होतीत, त्याची परतफेड कशी करू? त्यावर त्यांनी मला सल्ला दिला की, याची परतफेड करायचीच असेल तर तुझ्यासारखा एखादा गरजू मुलगा शोध आणि त्याला शिक्षणासाठी मदत कर. आज तुमच्या मुलाच्या रुपात मला या परतफेडीची संधी मिळते आहे. कृपया त्याला नाही म्हणू नका."

त्या बाईच्या डोळ्यात अश्रु तरळले होते. राज ने सांगितलेला प्रत्येक शब्द कदाचित त्या बाईला कळला नसावा पण त्याच्या भावना मात्र तिच्यापर्यंत पोचल्या होत्या. त्या भावनांची पोचपावती त्या अश्रुंद्वारे प्रकट होत होती, तर राजच्या चेहर्‍यावर परतफेडीचा आनंद झळकत होता.

Sunday, August 8, 2010

सूर्याची पिल्ले

सूर्याची पिल्ले --- नाटक तसं जुनच. वसंत कानेटकरांनी लिहिलेलं.

१. ५ एप्रिल १९७८ साली "धी गोवा हिंदु असोसिएशन" प्रथम रंगमंचावर आणलेलं. दिग्गज कलाकारांनी रंगवलेलं. नुसती नावं जरी घेतली तरी कल्पना येते. माधव वाटवे, बाळ कर्वे, दिलिप प्रभावळकर, मोहन गोखले, सदाशिव अमरापुरकर, शांता जोग इत्यादी इत्यादी.
२. व्हीसीडी च्या जमान्यात याच पुर्वीच्या संचात थोडेफार फरक करून सर्वांपर्यंत पोहोचलेलं हे नाटक. कानेटकरी विनोदाची एक वेगळीच मांडणी आणि जातकुळी सांगणारं हे नाटक. काळ बदलला तरी संदर्भ फारसे न बदलल्यामुळे ताजं वाटणारं.
३. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील पहिल्या अशा "आठवणीत रुतून बसलेल्या श्रेष्ठ नाट्यकृतींच पुनर्मंचन" म्हणजेच सुबक निर्मित सुर्याची पिल्ले.

स्वातंत्र्यसूर्य पंजाबराव तथा आबाकाका कोटीभास्कर यांच्या पुण्यतिथीनिमित्त असलेला कार्यक्रम ही या नाटकाची सुरुवात. या आबाकाकांचे ४ चिरंजीव - पांडूअण्णा, बजरंगा, रघुराया आणि श्रीरंगा. स्वातंत्र्यसूर्यांचे वारसदार असल्यामुळे आपणही काही थोर आहोत आणि आपल्याकडून सुद्धा काही दिव्य घडतं आहे ही या पुत्रांची विचारसरणी. अर्थात याला अपवाद म्हणजे श्रीरंगा. आबाकाकांनी सुरु केलेल्या विविध संस्थांचे एकमेव ट्रस्टी जांबुवंतराव ठाणेकर यांच्या मदतीने श्रीरंगा आपल्या इतर भावांना कसं सुधरवतो याची ही कहाणी. याला उपकथानक म्हणून ठाणेदारांची कन्या आणि रघुराया यांचं प्रेमप्रकरण सुद्धा आहे.

आबाकाकांच्या स्मरणार्थ होणार्‍या पुण्यतिथीच्या कार्यक्रमापासून सुरू होणारं नाटक श्रीरंगाच्या वाक्याने शेवटाकडे जातं "आपण जितक्या लवकर आबाकाकांना विसरू तितक्या लवकर आपले पाय जमिनीवर येतील." म्हणजे केवळ आपल्या पुर्वजांच्या पुर्वपुण्याईवर आपण जगू शकत नाही किंवा जगू नये असा काहीसा संदेश या नाटकात आहे.

आज या पुनर्निमित नाटकाचा अकरावा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला. त्यानिमित्ताने नाटका बद्दल आणि नाट्यप्रयोगाबद्दल थोडं काही ........

व्हीसीडी मुळे परत परत बघितलं गेलेलं हे नाटक. ते देखिल दिलिप प्रभावळकर, मोहन गोखले, सदाशिव अमरापुरकर यांसारख्या कसलेल्या कलाकारांकडून सादर केलं गेलेलं. त्यामुळे ही नव्या दमाची फौज काय करते ही उत्सुकता होतीच मनामध्ये. कारण शेवटी नविन कलाकारांकडून पाहात असलेल्या नाटकाची कुठेतरी आधीच्या संचाबरोबर तुलना होणं स्वाभाविक होतं. परंतू नाटक सुरू झाल्यापासून संपेपर्यंत ही अशी तुलना झालीच नाही, इतकं या नविन मंडळींनी आम्हाला नाटकात गुंतवून ठेवलं.

अर्थात हा नविन संच काही लेच्यापेच्या कलाकारांचा नाहिये. वैभव मांगले, आनंद इंगळे, पुश्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, उज्ज्वला जोग, आतिशा नाईक, उदय सबनिस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्षिती जोगच्या आजारपणामुळे आयत्या वेळेस उभी राहिलेली शर्वरी पाटणकर ही या नाटकाची सध्याची टीम. सगळ्यांचीच कामं एकापेक्षा एक सरस.

या पुनर्जिवित नाटकात फक्त कलाकारचं नविन होते असं नाही, तर काही नविन पद्धती सुद्धा अवलंबिल्या गेल्या. निदान माझ्यापुरतं बोलायचं झालं तर या पद्धती मी फारशा काही मराठी नाटकांमध्ये बघितल्या नाहीत. या पद्धती मला तरी भावल्या.

१. साधारणपणे आपण नाट्यग्रूहात गेल्यावर, तिकिट दाखवलं की डायरेक्ट आपल्या सीट्वर जाउन बसतो. पण इथे, नाट्यग्रूहात शिरल्यावर चक्क बायकांचं स्वागत गजरे देऊन आणि पुरुषांचं स्वागत गुलाबाची फुलं देऊन झालं.
२. फुलांचा सुगंध घेत असतानाच तिथे असलेल्या स्वयंसेवकांनी एक पत्रक हातात दिलं. त्या पत्रकात नाटकाबद्दलची माहिती, कलाकारांची नावं त्यांच्या फोटो आणि सही सकट आहेत. मुख्य म्हणजे क्षिती जोग या प्रयोगात काम करणार नाहिये, याची माहिती सुद्धा पत्रकात उपलब्ध आहे.
३. नाटक संपल्यानंतर पडदा पडायच्या आधी, एक एक करून सगळे कलाकार पुन्हा एकदा रंगमंचावर आले, प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी. या इथे सगळ्या टीमबरोबर टीमचा कप्तान उर्फ निर्माता सुनिल बर्वे पण आला.

तिसरा अंक सुरु होण्याआधी सुनिल ने प्रेक्षकांशी संवाद साधत, या उपक्रमाबद्दल अधिक माहिती पुरविली. या एका वर्षात यासारखी अजून ४ नाटकं सुबक तर्फे रंगमंचावर येणार आहेत. प्रत्येक नाटक वेगवेगळे दिग्दर्शक दिग्दर्शित करणार आहेत. प्रत्येक नाटकाचे फक्त २५ प्रयोगच होणार आहेत. अर्थात याबद्दल त्यांची काही गणितं असतील, पण माझ्या सारख्या प्रेक्षकाची एकच अपेक्षा आहे, की या २५ प्रयोगांनंतर या अशा प्रकारच्या नविन संचातील नाटकांचं योग्य ते जतन व्हायला हवं. म्हणजेच याच्या व्हीसीडीज किंवा डिव्हीडीज यायला पाहिजेत.

एकंदरीत २५ प्रयोगांपैकी ११ प्रयोग तरी झालेत. उरलेल्या प्रयोगांमध्ये तुम्हाला चान्स मिळाला तर तो अजिबात चुकवू नका.

Sunday, April 5, 2009

पार्टी

एप्रिल - मे चे दिवस. उन नेहमीप्रमाणे दिवसभर आग ओकत होते. अशाच एका शनिवारी संध्याकाळी गंप्या घरासमोरच्या अंगणात येरझार्‍या घालत होता. चार महिन्यांपुर्वी लग्न झाल्यापासून गंप्याला आपल्या मित्रांबरोबर टाईमपास करायला वेळच असा मिळाला नव्हता. पण आज चान्स होता. बायको दुपारीच माहेरी गेली होती आणि डायरेक्ट उद्या परतणार होती, त्यामुळे आजच्या रात्री मित्रांबरोबर जंगी पार्टी करण्याचा चांगला चान्स होता. पण अंगणात तिर्थरूप आणि किचन मध्ये मातोश्री यांना काय सांगून बाहेर पडायचे याचाच विचार मनात होता.
दुसरं म्हणजे गावात गंप्याचे दोनच मित्र होते, अव्या आणि किश्या. दोघेही अजून बिनलग्नाचेच होते, त्यामुळे त्यांना पार्टीसाठी काही प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे नसावा, असे गंप्याला वाटले. पण एकदा विचारले पाहिजे म्हणून गंप्याने पहिल्यांदा अव्याला फोन लावला.

अव्या नेहमीप्रमाणे तयारच होता पार्टीसाठी. त्यातच त्याने बातमी दिली, की करोना का कोरोना म्हणून काहीतरी नविन बीयर आली आहे मार्केटमध्ये. मग काय, आजच्या पार्टीत हीच बीयर ट्राय करायचा असा बेत ठरला या दोघांचा. आता प्रश्न होता तो जागेचा. अव्या आणि गंप्याच्या दोघांच्याही घरी शक्य नव्हते कारण दोघांचेही आईवडील घरातच होते. पण किश्याकडे तसा काही प्रॉब्लेम नव्हता, कारण तो एकटाच (P.G.) म्हणून राहत होता. म्हणून मग सगळा स्टॉक घेऊन त्याच्याकडेच जायचं ठरलं.

हे सगळं ठरवलं पण किश्याला जमणार आहे की नाही याचा विचारच आपण केला नाहिये, हे अव्याच्या लक्षात आलं आणि त्याने चटकन किश्याला फोन लावला.
"काय रे मित्रा, आज संध्याकाळचा काय प्लॅन?" अव्या
"अरे जरा कामिनी बरोबर बाहेर जाणार आहे, पण ८ - ८:३० पर्यंत मोकळा होईन" किश्या म्हणाला.
हे ऐकल्याबद्दल चटकन अव्याच्या लक्षात आलं की गेले काही दिवस किश्या या कामिनी नावाच्या नाजूक प्रकरणात थोडासा गुंतला आहे. पण निदान ८:३० नंतर मोकळा होणार आहे, हे ऐकून अव्या निर्धास्त झाला.
"तुझ्या फ्लॅटची ची चावी शेजारी ठेऊन जा रे" अव्याने किश्याला सगळा प्लॅन समजाऊन सांगितला आणि अव्या पुढच्या तयारीला लागला.

बरोब्बर ८ च्या सुमारास गंप्या तयार होऊन बाहेर पडतच होता की इतक्या अव्या बाईकवरून आलाच गंप्याला न्यायला.
"बरं झालं आलास ते. मी विचारच करत होतो, की कसं जायचं किश्याकडे याचा" गंप्या
"मग, यायलाच पाहिजे, आज तुला चक्क आमच्यासाठी वेळ मिळाला आहे ना? वहिनींनी परवानगी कशी दिली?" अव्या ने विचारलं.
"अरे परवानगी द्यायला इथे विचारतय कोण? आज सुलू माहेरी गेलीये म्हणून तर हा स्वातंत्रदिन.
चल निघुया पटकन, नाहीतर आमच्या तिर्थरूपांचे प्रवचन सुरू होइल इथे" गंप्या घाईघाईने म्हणाला.
"हो रे बाबा. ते टीव्हीवरचे बापू परवडले, पण तुमचे तिर्थरूप म्हणजे........ असो" अव्या ने लगेच बाईकला किक मारून बाईक सुरू केली.

वाटेतच पार्टीसाठी लागणारी बीयर आणि योग्य तो चकणा घेऊन ते दोघे किश्याच्या घरी पोचले.
एव्हाना किश्यापण घरी यायला पाहिजे होता. तो अजून आला नव्हता पण शहाण्या मुलासारखं त्याने फ्लॅटची किल्ली शेजारच्या काकूंकडे दिली होती, त्यामुळे अव्या आणि गंप्याचा बाहेर पुतळा झाला नाही.
फ्लॅटमध्ये येताच अव्याने बीयर फ्रीजमध्ये ठेवली, आणि दिवाणखान्यात आला. इथे गंप्याने ऑलरेडी टीव्ही चालू केला होता, आणि कतरिना काकूंचा डान्स बघण्यात गुंग झाला होता.
"आमच्याकडे सध्या हे असले चॅनल्स लागत नाहीत रे" गंप्याने आपले दु:ख अव्यासमोर मांडले.
"अरे रिमोटचा ताबा आपल्याकडे असला ना, म्हणजे सगळे चॅनल्स लागतात बरं" अव्या गंप्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
"तुझं लग्न झालं नाहिये ना म्हणून तू असं म्हणतोयस. लग्न झाल्यावर मग कळेल, की रिमोट कोणाच्या हातात असतो ते." गंप्या थोडा वैतागूनच बोलला.
"अरे पण हा किश्या कसा आला नाही अजून?
किती वेळ वाट पाहायची?
एकतर इतक्या महिन्यांचा उपास, आणि त्यात हा किश्या अजून वेळ घालवतोय" गंप्या आता बीयर पिण्यासाठी अधीर होत चालला होता.
"आपण एक काम करू. आपण सुरुवात तर करू. किश्या आला की तो आपल्याला जॉईन होइल. चालेल का?" अव्याने यावर योग्य तो तोडगा काढला.
"अरे नेकी ऑर पुछ पुछ? चल लगेच सुरू करुया" गंप्या हे बोलत बोलत किचन मध्ये गेला आणि बीयरच्या दोन बाटल्या घेउन आला.
"अरे ग्लास पण आणायचेस ना?" अव्या कावला
"ग्लास कशाला? लाव बाटलीच तोंडाला" गंप्याने आज्ञा केली

प्रत्येकी दोन दोन बाटल्या रिचवून गंप्याने जेंव्हा तिसरी बाटली उघडली, तेंव्हा अव्याच्या लक्षात आलं की अजून किश्या आलेला नाहिये.
"अजून कसा आला नाही रे किश्या" अव्याने गंप्याला विचारले, आणि दिवाणखान्यात फेर्‍या मारू लागला.
"तू एका जागी बस बघू, फेर्‍या मारू नकोस. फेर्‍या मारता मारता कुठल्यातरी बाटलीला धकका लावशील आणी बीयर फुकट घालवशील" गंप्याने अव्याच्या फेर्‍यामारण्याच्या चालीवरून त्याला फटकारले.
"अरे तो बघ, किश्याच येतोय." अव्या एव्हाना खिडकीपाशी पोचला होता, आणि खिडकीतूनच त्याने किश्याला पाहिले होते.
"या किशनमहाराज, कुठल्या राधेला घेऊन प्रणयक्रीडा चालू होती तुमची?" आल्या आल्या किश्यावर गंप्याने प्रश्नाचा भडिमार सुरू केला.
"अरे कुठल्या काय? कामिनीला घेऊन गेलो होतो फिरायला. तिला घरी सोडलं आणि लगेच आलो इथे." किश्याने आज्ञाधारक मुलासारखे उत्तर दिले.
इतक्यात अव्याने आत जाऊन अजून एक बीयरची बाटली आणली आणि किश्याच्या हातात दिली.
"चिअर्स" म्हणत तिघांनीही आपल्या हातातील बाटल्या उंचावल्या आणि प्यायला सुरुवात केली.

इतक्यात दारावरची बेल वाजली.
"आता कोण आलं मरायला?" अव्या आणि किश्या नकळत एकच वाक्य एकाच वेळेस बोलले.
तेव्हड्यात गंप्या उठला आणि त्याने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर एक पन्नाशीचा माणूस एकदम घरात घुसला आणि त्याला पाहून किश्याच्या चेहर्‍यावरचा रंगच उडाला.
"काका तुम्ही?" इतकंच वाक्य किश्या बोलू शकला.
अव्या आणि गंप्याला काहीच सुधरेना, की हा माणूस कोण आहे, आणि किश्या असा का घाबरला आहे.
"काका तुम्ही इथे कसे? तुम्हाला माझा पत्ता कोणी दिला? किश्या अजूनही घाबरलेल्या अवस्थेतच होता.
"अरे हे कामिनी दिशपांडे चे वडील" किश्याने हळूच अव्या आणि गंप्यासमोर उलगडा केला.
अच्छा म्हणजे हा काका, कामिनीचा बाप आहे तर. अव्या आणि गंप्याच्या डोक्यात थोडा थोडा प्रकाश पडू लागला होता. पण आता हा थेरडा इथे काय करणार आहे? गंप्याच्या डोक्यात किडा वळवळलाच.

किश्या अजूनही काकांकडेच बघत होता. काय बोलावं हेच सुचत नव्हतं त्याला. शेवटी न राहवून अव्याच म्हणाला, "काका, आत तर या. इथे आजुबाजुंच्या लोकांसमोर नको" तमाशा हा शब्द वापरायचा मोह महत्प्रयासाने टाळून अव्या बोलला.
काका दिवाणखान्यातल्या सोफ्यावर बसले आणि त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली किश्यावर.
किश्या अजून गांगरलेल्या अवस्थेतच होता.
"नाव काय तुमचं?
काय करता?
गंगाविहार सोसायटी मध्ये काय करत होतात?"
ततपप करून काकांच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. त्याच्या या गांगरण्यामुळे अव्या आणि गंप्या अजूनच वैतागत होते. पार्टीचा सगळा मूड जात होता. उरत होता फक्त प्रश्नोत्तराचा तास.

गंप्याला वाटलं एकदा चांगलं खडसवावं किश्याला आणि म्हणावं
"अरे बालका, केलं आहेस ना प्रेम कामिनीवर? मग आता कशाला तिच्या बापासमोर घाबरतोस? सरळ सांगून टाक त्याला, की हो आहे माझं कामिनीवर प्रेम".
पण किश्यामध्ये इतका दम नाहिये, हे गंप्याला माहित होतं.
पार्टीचा पुरता सत्यानाश होत असलेला पाहून शेवटी गंप्याला राहावलं नाही, आणि तोच पुढे होऊन म्हणाला
"अहो काका, हे वयच असं असतं. जडतं अशा वेळेस प्रेम एकमेकांवर. त्यात एव्हडं लाऊन काय घ्यायचं मनाला?
हा किश्या काही अगदीच काही हा नाहिये. मनापासून प्रेम करतो तो कामिनीवर." गंप्या काय बोलतोय ते चटकन काकांच्या लक्षातच आलं नाही.
"काय म्हणताय तुम्ही? कोण करतय प्रेम कामिनीवर? मी इथे यांच रस्त्यात पडलेलं पाकिट द्यायला आलो होतो.
"काय?" आश्चर्यचकित होऊन किश्या ओरडला
"हो काय काय? मगाशी तुमची आमच्या घराजवळून जाताना धांदरटासारखे कुत्र्याकडे बघत बघत बाईकवरून पडलात तेंव्हा तुमच्या खिशातलं हे पैशाचं पाकिट पडलं ते द्यायला म्हणून मी तुमच्या मागे येत होतो. बर्‍याच हाका मारल्या, पण तुम्ही काही मागे वळून पाहिलं नाहीत, म्हणून मग इथंपर्यत यावं लागलं मला. " काकांनी सगळा इतिहास कथन केला.

पण या सगळ्यात किश्याचं कामिनीवर प्रेम आहे, ही अंदरकी बात काकांना कळलीच आणी ते पुन्हा एकदा संतापले.
गंप्याला आता आपली चुक समजली होती. त्याच्या गाढवपणामुळेच काकांना किश्या आणि कामिनीच्या प्रेमप्रकरणाचा सुगावा लागला होता. त्यामुळे ती चुक निस्तरायलाच पाहिजे होती पण अर्थात चुक निस्तरायला आता तेव्हडा वेळ नव्हता.

शेवटी अव्या पुढे आला, आणि म्हणाला
"थ्यांकू काका, या किश्याचं पाकिट परत आणून दिल्याबद्दल.
आता इथपर्यंत आलाच आहात तर घेणार का थोडी आमच्याबरोबर?"
या ऑफरचा मात्र काकांनी विनाविलंब स्वीकार केला आणि गंप्याने किचन मध्ये जाऊन अजून एक बाटली आणली.
"चिअर्स" या तिघांबरोबर काकांनी सुद्धा हात उंचावला आणि बीयरचा पहिला घोट घेतला.

Tuesday, March 10, 2009

कर

कर कापलेला, कर वाचलेला
कर दिलेला, कर मारलेला

कर कर म्हणून
काहीच करू नाही दिलं
काहीच न केलेल्या कामाचं
करदायीत्व मात्र कपाळी आलं

कर भरणे ही देशाची सेवा
करामुळे होते देशाची प्रगती
या नसत्या लफड्यापायी
बँकबॅलन्स्ची मात्र होते अधोगती

कर भरावा की न भरावा
नुसत्याच होतात गरम चर्चा
कळत नकळत पेस्लिप मधून
कर होतो मुद्दलातच वजा

म्हणून म्हणतो हे गड्यांनो
कर देणे प्राप्त आहे
आघाडी असो किंवा युती असो
आपल्या करावर त्यांचा डोळा आहे